विषाणूजन्य, संसर्गजन्य आजार : लहान मुलांना होऊ शकते सर्वाधिक बाधा संदीप मानकर अमरावतीलहान मुलांना होणाऱ्या प्रमुख आजारांपैकी ‘हँड, फुट माऊथ डीसिज’ हा एक प्रमुख रोग आहे. अलिकडे जिल्हयात या आजारांचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून १ ते १० वर्षे वयोगटातील लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांनाही या आजाराची बाधा होऊ शकते. हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य असून स्पर्शातून तो वेगाने पसरत असल्याची माहिती तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या आजाराचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत होऊ शकतो. ुउन्हाळा आणि पावसाळ्यात रोगाची शक्यता अधिक असते. विशिष्ट प्रकारच्या जंतुंच्या प्रादुर्भावाने या आजाराचा फैलाव होतो. लहान मुलांना ताप येणे, तळहात, तळपाय व तोंडाच्या आसपास आणि घशातून बारीक पुटकुळ्या येणे, त्यांना खाज सुटणे आणि प्रचंड वेदना अशी या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराची लक्षणे आढळल्यानंतर त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेचे आहे. साधारणपणे सहा ते सात दिवस या आजाराची लक्षणे असतात. या आजारामुळे आलेले पुरळ बरे झाल्यानंतरही काही दिवस त्याचे डाग जात नाहीत. मात्र, यथावकाश ते विरळ होतात. उलट्या, मळमळणे, अंगदुखी आणि ताप ही आजाराची प्राथमिक लक्षणे असल्याचे बालरोगतज्ज्ञ सुनील रघुवंशी यांनी सांगितले. अशा या त्रासदायक आजाराचा प्रादुर्भाव अमरावती जिल्ह्यात झाला असून आजाराने बाधित अनेक रूग्ण रूग्णालयांमध्ये उपचारार्थ येत आहेत. हा आजार दीर्घकालीन परिणाम करणारा किंवा अतीगंभीर नसला तरी त्रासदायक व संसर्गजन्य असल्याने पालकांनी काळजी घेणे व सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरते. पाल्य या आजाराने बाधित असेल तर त्याला शाळेत पाठविणे टाळावे, असेही तज्ज्ञांचे मत आहे. पालकांना या आजाराची लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सावधान !‘हँड, फुट, माऊथ डिसीज’फोफावतोय
By admin | Updated: November 4, 2016 00:37 IST