ग्रामस्थांमध्ये दहशत : परवानगीशिवाय जंगलात जाणे टाळा, वनविभागाचे आवाहन वैभव बाबरेकर अमरावती पोहरा जंगलात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. नागरिकांनी पूर्वपरवानगीशिवाय जंगलात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. जगंलाशेजारी राहणाऱ्या नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा परिमंडळ वनक्षेत्रात विविध वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. अनेकदा बिबट, हायना, निलगाय, हरिण अशा आदी वन्यप्राणी नागरिकांच्या दृष्टीस पडले आहेत. मध्यंतरी बोर अभयारण्यातील वाघ स्थलांतरण करून पोहरा वनपरिक्षेत्रात अधिवास करीत होता. मात्र, कालांतराने तो वाघ परतल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. मात्र, आता पुन्हा पोहरा-चिरोडीच्या जंगलात वाघ दृष्टीस पडला असून त्या वाघाचे छायाचित्र कॅमेरात कैद झाले आहेत. गुरुवारी रत्नापूर तलावाशेजारच्या जंगलात काही शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाले. भानखेडा परिसरातील अंकुश पवार याला वाघ दृष्टीस पडल्याचे काही वन्यप्रेंमीनी सांगितले. वनसंपदेने समृध्द असलेल्या वडाळी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. वाघाचे अस्तित्व सिद्ध झाल्याने वनविभाग सतर्क झाला आहे.
सावधान ! पोहरा-चिरोडीच्या जंगलात वाघाचा मुक्त संचार
By admin | Updated: January 1, 2017 00:39 IST