अनुदान योजना : संबंधित व्यक्तींच्या खात्यात होणार जमाअमरावती : दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डधारकांना आधार नंबर आणि माहिती लिंक करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर प्रतिव्यक्ती शंभर रूपये अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. हे अनुदान संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे शासनाच्या रेशनकार्डला आधार लिंक जोडण्याच्या योजनेचे काम गतिमान होण्याची अपेक्षा आहे. केंद्र शासनाने गॅस अनुदान वितरणासाठी ग्राहकांचे कनेक्शन आधार कार्डला जोडले. त्यापाठोपाठ रेशन कार्डलाही आधार जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे भविष्यात रेशनवर मिळणाऱ्या धान्याचेही अनुदान बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्या दिशेने सरकारचे प्रयत्न आहेत, त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका आधारकार्डला जोडण्याची मोहीम सुरू आहे. जिल्ह्यात चार लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील प्रत्येक व्यक्तीची माहिती, त्याचा बँक खाते नंबर आणि आधार क्रमांक नोंद करण्यात येत आहे. त्यांचा संगणकीकृत डाटा तयार करण्यात येत आहे. त्यावर कुटुंबातील महिलेचा फोटो लावण्यात येणार आहे. या मोहिमेला ग्रामीण भागात गती मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रतिव्यक्ती १०० रूपये अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यात २ लाख ७२ हजार ७९५ दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका धारक आहेत. या कुटुंबामधील व्यक्तीची माहिती गोळा करण्यात अडचणी येत आहेत. या कुटुंबामधील व्यक्ती साधारणपणे रोजगाराची कामे करीत असल्याने त्यांना सुटी घेऊन आधार नंबर जोडण्यासाठी जाणे परवडणारे नसते, याचाही विचार शासनाने केला आहे. त्यामुळेच या कुटुंबातील व्यक्तींना आधार नंबर जोडण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान सुरू करण्यात आले आहे. या योजनेला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा प्रतिसाद मिळत आहे.१३ व्या वित्त आयोगातून निधीमागील डिसेंबर महिन्यात शासनाने ही योजना सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला कळविल्या आहेत. या योजनेसाठी १३ व्या वित्त आयोगातून निधी देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या क्षेत्रातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबामधील व्यक्तीची संख्या लक्षात घेऊन निधी देण्यात येत आहे.
दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांना ‘आधार’
By admin | Updated: July 4, 2015 00:51 IST