अमरावती : विभागात ४८ तासात झालेल्या वादळासह अवकाळी व गारपिटीमुळे गहू, कांदा, केळी, आंबा, संत्रा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे. या आपत्तीमध्ये पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात नुकसान झाले आहे. सायंकाळपर्यंत शासनाला प्राथमिक अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. वादळाने अनेकांचे संसार उद्वस्थ झाले. शिवाय अंगावर झाड पडल्याने एक बैल ठार झाला. रत्यावर झाडे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला तसेच वीज पुरवठाही खंडित झाला.
महसूल विभागाची यंत्रणा निवडणूक कामाला व्यस्त असल्याने मदत कार्यात दिरंगाई होत असल्याचा आपदग्रस्तांचा आरोप आहे. ‘महावेध’च्या अहवालानूसार २४ तासात अमरावती जिल्ह्यात सरासरी १३.३ मिमी, यवतमाळ १६.५ मिली, वाशिम १०.९ मिली, अकोला ८.२ मिली व बुलडाणा जिल्ह्यात ३.६ मिली पावसाची नोंद झालेली आहे.