अमरावती : राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेत नसलेली सरळ सेवा भरतीची गट ‘क’ वर्गीय पदे व गट ‘ब’ मधील अराजपत्रित पदे त्वरित भरण्याचे आदेश २६ मे रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव राजेंद्र सुर्वे यांनी काढला आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे १ लाख २४ हजार पदांचा अनुशेष भरण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निवड समित्या प्रादेशिक विभाग प्रमुखांच्या स्तरावरील प्रादेशिक निवड समिती व विभाग प्रमुखांच्या स्तरावर राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्यांनी राज्य शासनाच्या २७ जून २००८ व ३ जून २०१४ च्या शासन धोरणानुसार भरती प्रक्रिया राबवायची आहे. राज्यातील शासकीय कार्यालयातील गट ‘अ’ ते गट ‘ड’ संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी विहीत केलेल्या प्रतिवर्षी मंजूर पदांच्या कमाल तीन टक्यांची मर्यादा यापूर्वीच शासनाने रद्द केलेली आहे. सद्यस्थितीत भरती प्रक्रियेवर निर्बंध नसल्याने रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांनी जिल्हा निवड समित्यांच्या अखत्यारितील रिक्त पदांची मागणी पत्रे संबंधित निवड समितींकडे त्वरित पाठवावी. जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने त्यांच्या अखत्यारितील रिक्त पदे भरण्याबाबत व नवीन नेमणुका त्वरित करण्याचे आदेश या शासन निर्णयात दिले आहेत. (प्रतिनिधी)
सरळ सेवा भरतीने भरून निघणार रिक्त पदांचा अनुशेष
By admin | Updated: June 3, 2015 00:22 IST