अमरावती : कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत तीन वर्षे पदवी संपादन करुन केवळ एक वर्षाची बी.एड. पदवी प्राप्त केली की झाले शिक्षक...! ही रुढ पद्धत येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे. आता शिक्षक होणे सोपे राहणार नाही. कारण बी.एड., एम.एड. व बी.पी.एड. या पदव्या जूनपासून दोन वर्षाच्या होत आहेत. भावी शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणशास्त्र परिषदेने (एनसीटीई) येत्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल अमलात आणण्याचे ठरविले आहे. १९९३ नंतर प्रथम परिषदेने अशा प्रकारे बदल केले आहेत.राष्ट्रीय शिक्षण शास्त्र परिषदेने याचा निर्णय जाहीर केला असून, भारत सरकारच्या राजपत्रात याची अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण समिती (एनसीटीई), मानव संसाधन आणि विकास खाते (एमएचआरडी) यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. जूनपासून राज्यात ३३८ बी.एड. महाविद्यालयांमध्ये आता दोन वर्षासाठी यंदा प्रवेश मिळणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रम चार वर्षे आणि एमबीबीएस अभ्यासक्रम पाच वर्षाचा असतो. या पार्श्वभूमीवर बी.एड. अभ्यासक्रमाचे गांभीर्य अनुभवण्यासाठी शिक्षणतज्ज्ञांनी हा निर्णय घेतला आहे. तीन वर्षाची पदवी आणि त्यानंतर दोन वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम म्हणजेच आता शिक्षक होण्यासाठी पदवीसह पाच वर्षे लागणार आहेत. (प्रतिनिधी)
बी.एड्.,एम.एड्.पदवी आता दोन वर्षांची
By admin | Updated: January 5, 2015 22:56 IST