आसरा (भातकुली): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी या आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याऐवजी सतत भातकुली येथील आरोग्य केंद्रात उपस्थित राहात असल्याने येथील रूग्णांचे हाल होत आहेत. शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन यापैकी कोणीही कायमस्वरूपी मुख्यालयी राहात नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. असे असूनही बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागही यास अपवाद नाही. अनेक ठिकाणी डॉक्टरच नेमून दिलेल्या रूग्णालयात राहात नसल्याने रूग्णांना हेलपाटे घ्यावे लागतात. शेवटी आर्थिक ताण सहन करून खासगी दवाखान्यांमधून उपचार करून घ्यावे लागतात. आसरा गावात तर हे चित्र अधिकच विदारकपणे समोर आले आहे. या गावात दोन तलाठी आहेत. परंतु हे तलाठी केवळ २६ जानेवारी आणि १५ आॅगस्ट या दोन दिवशीच गावकऱ्यांच्या दृष्टीस पडतात. इतर दिवशी यांचा पत्ता नसतो. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक महत्वाच्या कामांसाठी महिनोन्गणती प्रतीक्षा करावी लागते. या कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामस्थांचे मात्र हाल होत आहेत. सद्यस्थितीत एक कोतवाल गावचा कारभार पाहात आहे. आसरा येथील ग्रामसेवकांना भातकुलीचा कार्यभारदेखील सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना भातकुलीत येणे-जाणे करावे लागते. परिणामी त्यांना आसरा गावातील समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे आसार गाववासीयांच्या अडचणी रखडल्या आहेत. विद्युत कर्मचाऱ्यांचीही तीच गत आहे. आसरा येथे स्थायी स्वरूपात राहणारा एकही वीज कर्मचारी नाही. त्यामुळे ऐनवेळी, रात्री-बेरात्री विजेची समस्या उदभवल्यास नागरिकांना एक तर अंधारात रात्र काढावी लागते किंवा शहरात जाऊन लाईनमन आणावा लागतो. शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी कुणीही आसरा येथे कायमस्वरूपी राहात नसल्याने येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. समस्या नेमकी मांडावी तरी कुणापुढेय असा प्रश्न त्यांच्या समक्ष उपस्थित झाला आहे. आसरा गावात ग्रामपंचायत कार्यालयानजीकच्या एका खोलीत पोलीस चौकी, आसरा असा फलक बऱ्याच दिवसांपासून लागलेला आहे. परंतु याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी आजवर ग्रामस्थांना आढळून आलेला नाही. या पोलीस चौकीला नेहमीच कुलूप असते. गावात आपातकालिन स्थिती उदभवल्यास बाहेरून कुमक येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष वाढीस लागला आहे. गावातील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याबाबत कोणाकडे तक्रार करावी, अशा पेचात ग्रामवासी अडकले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सर्वच विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी.
मुख्यालयी राहण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाळ
By admin | Updated: November 10, 2014 22:37 IST