फोटो पी ०६ चतुर
अनिल कडू
परतवाडा : रक्तदान चळवळीला समर्पित अवलिया अचलपूर शहरात एका साध्या घरकुलात वास्तव्यास आहे. आरोग्यसेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या या अवलियाचे नाव विनय चतुर असे असून, या अवलियाने अचलपूर शहरात रक्तदान चळवळ मजबूत केली आहे. या चळवळीतून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणारे जवळपास ६०० रक्तदाते एकट्या अचलपूर शहरात उभे ठाकले आहेत.
२००१ पासून स्वतः दरवर्षी खंड न पडू देता हा अवलिया रक्तदान शिबिर घेत आहे. शिबिरापूर्वीही स्वतः रक्तदान करून अनेकांचे प्राण या अवलियाने वाचविले आहे. शहरात जिथे कुठे रक्तदान शिबिर असेल, तेथे स्वतः पोहोचून ते रक्तदाते गोळा करतात. या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवितात. शहरातील सहाशे रक्तदात्यांसोबत त्यांची ओळख आहे. या रक्तदात्यांची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे आहे. कोणी, कुठे रक्त दिले आणि केव्हा दिले, त्या रक्तदात्याला तीन महिने झाले आहेत किंवा नाही, याचीही माहिती त्यांना मुखोद्गत आहे. अनेक रक्तदात्यांचे मोबाईल नंबरही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
विनय चतुर नामक हा अवलिया अविवाहित असून, त्याने आपले जीवन रुग्णसेवेला समर्पित केले आहे. वेळ-काळ न बघता नागरिकांच्या मदतीला ते धावतात. आवाज दो, हम तुम्हारे साथ है, असे हे व्यक्तिमत्त्व. नागरिकांनी स्वतः वर्गणी गोळा केली आणि त्या वर्गणीतून त्यांना एक छोटेखानी मोटरसायकलही भेट दिली आहे. अवलियाच्या या मोटरसायकलमध्येही प्रेमापोटी कित्येकदा नागरिक स्वतः पेट्रोल भरतात. कधी पायी कधी मोटरसायकलवर, तर कधी सायकल वर फिरणारा हा रक्तदानाचा छंद जोपासून असलेला अवलिया शहरात व शहराबाहेरही सर्वांच्या परिचित आहे.