अमरावती : चार लाखांची खंडणी मागून एका इसमाला चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
सुशील ऊर्फ खंड्या राजेंद्र वानखडे (रा. नवसारी) असे आरोपीचे नाव आहे. शेगाव नाका चौकात गुरुवारी सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.
नवसारी परिसरातील महात्मा फुले नगरातील राहिवासी गणेश रामाजी जांभूळकर (४८) हा पेंटरकाम करतो. त्याच्याविरुद्ध काही महिन्यांपूर्वी एक गंभीर गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण न्याप्रविष्ट आहे. त्या प्रकरणातील पीडिता ही सुशील वानखडेची परिचित आहे. न्यायालयीन प्रकरणातून मुक्त व्हायचे असेल, तर चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सुशीलने गणेशला म्हटले होते.
दरम्यान, गणेश हा गुरुवारी बडनेरात कामावर असताना, सायंकाळी ४ च्या सुमारास सुशील वानखडेचा त्याला फोन गेला. महत्त्वाची चर्चा करायची आहे, असे सांगून शेगाव नाका येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यामुळे पावणेपाचच्या सुमारास जांभूळकर बडनेरातून शेगाव नाका येथे पोहोचला. सुशीलने त्याच्याकडे पुन्हा चार लाखांची मागणी केली. गणेशने नका देत, जे होईल ते न्यायालयात होईल, असे सांगितले. यामुळे संतापलेल्या सुशीलने चाकू काढून त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाले. प्रकरणाची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले.