अमरावती : पाऊस पडण्याचा कालावधी १२० दिवसांचा असतो. यंदा त्यातील ४० दिवस कोरडे गेले. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जून महिन्याची सरासरी २०८.४ मि.मी.असताना केवळ ७६.५मि.मी. पाऊस पडला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर केवळ १.६ मि.मी. पाऊस पडला आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांची तिफन थांबली आहे. जिल्ह्यातील खरीप २०१४ हंगामाची वेळ संपत आली आहे. मात्र, अद्याप ९६ टक्के क्षेत्रामधील पेरणी व्हावयाची आहे. रोहीणी, मृग व आर्द्रा कोरडे गेले. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले आहे. या दरम्यान ४० दिवसांत केवळ १२ व २६ जून तसेच ५ जुलै रोजी तुरळक स्वरूपात पाऊस पडला. जून महिन्यातील पावसाची सरासरी २०८.४ मि.मी. असताना ७ जुलैपर्यंत केवळ ७६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार ३ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या एकूण सरासरी क्षेत्र ७,१४,९५० असताना केवळ ३४,६२८ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या चार दिवसांत पेरणी क्षेत्रात अंशत: बदल झाला. ५ जुलै रोजी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, पेरणीचे धाडस शेतकऱ्यांनी केले नाही.२०,३१२ हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली. या पाठोपाठ १०,३८५ क्षेत्रात सोयाबीनची तर २९४० हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. अन्य भात, मका, भाजीपाला क्षेत्राची सरासरी केवळ ४.८ टक्के आहे.
वातावरण ढगाळ, मात्र पावसाची हूल
By admin | Updated: July 7, 2014 23:19 IST