जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शालेय पातळीपासून क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, जेणेकरून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अधिक पदक विजेते खेळाडू असतील. या दृष्टीने शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, जिल्ह्यात या उद्देशाला तडा जात असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १,५८३पैकी ३९७ शाळांना मैदानच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यात १ हजार ५८३ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यापैकी३९७ शाळांना विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही. याशिवाय नगर परिषदेच्या ९७ शाळा आहेत. यापैकी ९ ठिकाणी महापालिकेच्या ६४ शाळा असून, यामधील १३ शाळांमध्ये मैदानाचा अभाव आहे. खासगी अनुदानित ७४१ शाळा आहेत. यातील २७ आणि खासग विनानुदानित ३७२ शाळांपैकी १६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही, अशा एकूण सर्व ४६२ शाळांमध्ये क्रीडांगण नसल्याची बाब या अहवालावरून स्पष्ट होते. या शाळांमध्ये क्रीडांगणच उपलब्ध नसल्याने उकृष्ट खेळाडू कसे तयार होतील, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शहरासह विविध सामाजिक संघटना, क्रीडा संघटना याशिवाय जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद, क्रीडा विभाग आदी माध्यमांतूनही शहर व जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. फक्त त्यांना मैदान व सुविधांची आवश्यकता आहे. अशी भावना व्यक्त होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी याउलट परिस्थिती आहे. सार्वजनिक मैदानांबरोबर प्रत्येक शाळेमध्ये स्वतंत्र मैदान असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील जवळपास २ हजार ८०० शाळांपैकी ४६२ शाळांमध्ये आजही विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना फटका बसतो. त्यामुळे शालेय स्तरावर आवश्यक असलेल्या क्रीडा सुविधांअभावी त्यांना अनेकदा क्रीडा स्पर्धांसाठी सराव करता येत नाही. परिणामी उकृष्ट खेळाडू असतांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होता येत नाही.