वरुड : शासनाची मान्यता नसलेल्या बियाण्याची छुप्या पद्धतीने बाजारात विक्री केल्याप्रकरणी तालुक्यातील घोराड येथील एका विक्रेत्याला अटक करुन बनावट कृषी माल जप्त करण्यात आला. यामुळे कृषी दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.वरुड तालुक्यातील घोराड येथे कास्तकार कृषी सेवा केंद्रात कपाशीचे नकली आणि तणनाशक बियाणे विकली जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभाग, पंचायत सिमती कृषी अधिकारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाला मिळाली होती. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान संयुक्त पथकाने घोराड येथील कास्तकार कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रणव सुरेश कडू यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात काही आढळले नाही. परंतु अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त करून बंद घराची चौकशी केली असता शौचालय आणि बांथरुममधून बोलगार्ड तणनाशक कपाशी असे लिहिलेले बी.जी-३ कंपनीची मान्यता नसलेली कपाशी बियाण्याचे ६३ पाकिटे आढळून आली. या पाकिटांची किंमत ५८ हजार ५९० रुपये आहे. यामध्ये मल्लीका ५५ च्या ३८ बॅग, बोलगार्ड २५ अशी ६३ पाकिटे जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करुन कृषी दुकानदार प्रणव कडू याच्याविरुद्ध कलम ६,८,२५,२९, ई.पी. अॅक्ट १९८८६ ७(१)(८), बियाणे गुण निरीक्षक आदेश १९८३, बियाणे अधिनियम १९६६ चे कलम ६,७,१७, बियाणे अधिनियम १९६८ चे कलम ७,८,९ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही कारवाई पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज वानखडे यांच्या तक्रारीवरुन करण्यात आली. यामध्ये तालुका कृषी अधिकारी के.यू. उके, पंचायत समिती कृषी अधिकारी पंकज वानखडे, प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, पंकज गावंडे यांच्या पथकाचा समावेश होता.
वरुड तालुक्यात कपाशीचे बनावट बियाणे विकणाऱ्याला अटक
By admin | Updated: June 21, 2014 23:45 IST