गतवर्षी जिल्ह्यात जास्त पाऊस असल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. बियाण्याची उपलब्धता कमी व दरही जास्त होते. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे, तर पेरलेले बियाणे हे सरळ वाणाचे आहेत, त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे. त्यासाठी काही आवश्यक सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पीक वाणापासून तीन मीटर अंतरावर असावे. बीजोत्पादन करताना फुलोरा अवस्था किंवा दाणे पक्व झाल्यावर मेन्कोझेब (०.२ टक्के ) किंवा कार्बेन्डाझिम (०.१ टक्के) फवारणी केल्यास बियाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे सोयाबीन बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी शेवटच्या पेरणीमध्ये वरील बुरशीनाशकाचा वापर अवश्य करावा. बीजोत्पादन घेतलेल्या जातीच्या गुणधर्मांव्यतिरिक्त या पिकाच्या इतर गुणधर्मांची झाडांपासून भेसळ होते. उच्च प्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी बीजात्पादन क्षेत्रात आढळून येणारी भेसळ, आहेपार्ह तणवेळच्या वेळी काढावे. प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्याकडील जास्तीचे राखून ठेवलेले सोयाबीन बियाणे गावातील शेतकऱ्यांना उगवणक्षमता तपासणी करून विक्री करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.