विजेची चोरी, ग्राहकाची मुजोरी, पाच जणांविरुद्ध गुन्हा
अंजनगाव सुर्जी : वीजचोरी पकडली गेल्याने चिडलेल्या व्यक्तीने जमाव करून महावितरणच्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी अंजनगाव सुर्जी शहरात घडली.
पोलीस सूत्रांनुसार, स्थानिक आलम चौक येथील वाजिद खान रियाजुल्ला खान याच्या घरी महावितरणने पुरविलेल्या मीटरमधून थेट वायर टाकून वीजचोरी होत असल्याचे पथकातील सहायक अभियंता संदीप गुजर व त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची छायाचित्रे व व्हिडिओ काढला. आरोपी वाजिद खान रियाजुल्ला खान याच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्याने सहायक अभियंता गुजर व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यानंतर इतर चार चौघांना बोलावून घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच नीलेश बर्वे या कर्मचाऱ्याचा मोबाईल हिसकून काढलेले व्हिडिओ व फोटो डिलीट केले. या प्रकरणाची तक्रार सहायक अभियंता संदीप गुजर यांनी अंजनगावसुर्जी पोलीस ठाण्यात केली.
अंजनगाव सुर्जी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास होत आहे.