मतदारांच्या भेटीगाठी सुरुच: प्रभुदास भिलावेकर मेळघाट दौऱ्यावरगणेश वासनिक - अमरावतीमागील १६ दिवसांपासून आमदार घरी पोहोचले नाहीत, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. पण हो हे खरे आहे. मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर हे १९ आॅक्टोंबर रोजी निवडून आल्यानंतर या एकच दिवशी घरी ते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पोहचले. त्यानंतर ते सतत मतदारांच्या भेटीगाठी आणि गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ‘आमदार जनतेच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहेत. एकदा निवडून गेले की, त्यानंतर कोणीही आमदार पाच वर्षे गावात येवून समस्या जाणून घेत नाही, ही मेळघाट मतदार संघातील मतदारांची निवडणूक प्रचारादरम्यान गाऱ्हाणी होती. मात्र प्रभुदास भिलावेकर हे भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांनी आदिवासी मतदारांच्या या गाऱ्हाणीला प्रत्यक्ष कृतीत उत्तर देण्यासाठी गावोगावी जाऊन भेटीगाठी सुरु केल्या आहेत. विजयाच्या दिवशी एकदाच घरी गेले. त्यानंतर ते सतत मतदारांच्या भेटीगाठी घेत असून गावोगावी जावून आदिवासी बांधवांची कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या समस्या व प्रश्न पोटतिडकीने ऐकून घेत आहे. मागील १६ दिवसांपासून आ. भिलावेकर यांचा हा शिरस्ता अव्याहतपणे सुरुच आहे. मेळघाटातील ४१५ गावांपैकी आतापर्यत ६५ गावांमध्ये जावून त्यांनी मतदारांशी संवाद साधला असून गावात करावयाच्या अतिमहत्वाच्या विकास कामांची नोंद सुद्धा ते घेत आहेत. मेळघाटात कुपोषण, वीज समस्या, पाणी, रोजगार, योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेली घुसखोरी ही बाब आर्वजून निर्दशनात आल्याचे आ. भिलावेकर यांनी धारणी येथे बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर ते ‘लोकमत’ शी बोलत होते. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असून मेळघाटातही भाजपचे कमळ फुलले आहे. त्यामुळे आदिवासींच्या जीवनात नवी उभारी यावी, याअनुशंगाने आपण विकास कामे करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अख्ख्ये मंत्रीमंडळ मेळघाटात आणून येथील समस्यांवर तोडगा काढण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. त्यामुळेच मेळघाट मतदार संघातील प्रत्येक गावात जात असताना तेथील समस्या, समजून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या शासनाकडे सादर करताना वस्तुनिष्ठ असाव्यात यावर त्यांचा भर आहे. यापूर्वीचा लोकप्रतिनिधी म्हणून असलेला प्रशासकीय कामकाजांचा अनुभव भिलावेकर यांच्या पाठीशी आहे. ३५० गावांमधील समस्या, प्रश्न जाणून घ्यायच्या आहेत. याकरिता किमान दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.
...अन् आमदार घरी पोहोचलेच नाही
By admin | Updated: November 6, 2014 22:48 IST