लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणातील 'हायब्रीड अॅन्युटी' अंतर्गत निर्माण केलेला अमरावती, शिराळा ते चांदूरबाजार या दरम्यान रस्ता अवघ्या दोन वर्षातच उखडला आहे. तब्बल २०० कोर्टीच्या निधीतून साकारलेल्या या डांबरीकरणाच्या रस्त्यावर हल्ली जागोजागी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी तो दबला आहे. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर खरेच साकारण्यात आला का? असा सवाल उपस्थित होतो. परिणामी मुख्य अभियंत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सरकारने मोठा गाजावाजा करून 'हायब्रीड अॅन्युटी' अंतर्गत रस्त्याचे जाळे निर्माण करण्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती, शिराळा ते चांदूरबाजार या दरम्यान ३० किमी लांबीच्या या रस्त्यावर हल्ली वाहनचालकांना 'डॉन्सिंग कार' सारखा अनुभव येत आहे. या रस्त्याची निर्मिती करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे आता सिद्ध झाले आहे. कारण हा रस्ता अनेक जागी 'सिंक' झाल्यामुळे तो साकारताना जमिनीवर डांबरीकरणात वापरलेले साहित्य दर्जाहीन असल्याचे स्पष्ट होत आहे. हा रस्ता निर्माण होऊन पाच वर्षे झाले, पण तो दोन वर्षांतच उखडला आहे.
पावसाचे पाणी तुंबले, अपघाताची शक्यताहा रस्ता जागोजागी दबला (सिंक) असल्याने पावसाचे पाणी साचून आहे. या रस्त्याची निर्मिती करताना योग्य ते साहित्य, मशिनरीचा वापर झाला नाही. त्यामुळे आता डांबराचे प्रमाण आणि दर्जा तपासणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करावी लागणार की काय? असे दिसून येत आहे. हल्ली पावसाळ्यात या रस्त्यावर जागोजागी पाणी साचत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना कमालीची कसरत करावी लागत आहे.
विधिमंडळातही गाजला हा रस्ताअमरावती, शिराळा ते चांदूरबाजार या दरम्यान ३० किमी लांबीच्या या रस्त्याची निर्मिती करताना ई-निविदेतील अटी, शर्तीला बगलदेण्यात आल्याप्रकरणी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात २०१८-२०१९ मध्ये हा रस्ता गाजला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहात थातुरमातुर उत्तर देत वेळ मारून नेली होती. अखेर हा रस्ता कसा दर्जाहीन निर्माण करण्यात आला, हे लोकप्रतिनिधींसह आता जनतेच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे या रस्ता निर्मितीचे विशेष ऑडिट करून दोषींची चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
पेव्हिंग सोल्डर दिसेनासे, कंत्राटदाराने लावला चुना
- रस्त्यालगत पेव्हिंग सोल्डर हे सुद्धा दिसेनासे झाले आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचा असेल, अशा प्रकारे ई-निविदेत अटी, शर्ती होत्या. मात्र, कंत्राटदारांनी हा मार्ग थातुरमातुर निर्माण करून सरकारलाच चुना लावण्याचे काम केल्याचे आता या रस्त्याची दयनीय झाल्यानंतर दिसून येत आहे.
- करारनाम्यानुसार १० वर्षांपर्यंत या रस्त्याची डागडुजी, दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे; परंतु दोन वर्षांतच हा रस्ता उखडला असताना ना दुरुस्ती, ना डागडुजी करण्यात आली. बांधकाम विभागात नेमके चालले तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.