दर्जेदार शिक्षण तरीही पिछेहाट : विभागीय शिक्षण मंडळाने करावे आत्मपरीक्षणअमरावती : माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल घोषित झाला. निकालामध्ये अमरावतीची टक्केवारी वाढली असली तरी ‘एज्युकेशन हब’म्हणून उदयास येणाऱ्या अमरावती विभागाची राज्यस्तरावरील पिछेहाट मात्र शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांना निश्चितच सलणारी आहे. निकालाची टक्केवारी वाढली यापेक्षा अमरावती विभाग राज्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही बाब खेदजनक आहे. या पिछेहाटीची म्हणूनच कारणमीमांसा व्हायला हवी.अमरावती हे विभागीय केंद्र असून या विभागातील पाचही जिल्ह्यात २ हजार ४६७ शाळा आहेत. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेसाठी अमरावती विभागात १ लाख ७५ हजार ३२२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ७४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये १ लाख ५१ हजार ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मात्र, तरीही राज्यातील अन्य विभागाच्या तुलनेत अमरावती विभागाची टक्केवारी कमी असून यंदा ८६.७४ टक्केच निकाल लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रमुख कार्यालय अमरावतीत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दावा करणाऱ्या अनेक ख्यातनाम शिक्षणसंस्था अमरावतीत आहेत. अनेकदा ही बाब या शिक्षणसंस्थांनी सप्रमाण सिध्दही केली आहे. मात्र, तरीही राज्याच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत अमरावती विभाग का माघारला? हे शोधणे गरजेचे आहे. विद्यार्थी संख्या कमी असूनही इतर विभागांची गुणवत्तेची टक्केवारी वाढली असून अमरावती विभागात विद्यार्थी संख्या अधिक असूनही टक्केवारी घसरण्याचे कारण काय? याचे उत्तर शोधायलाच हवे. एकीकडे अमरावती विभागीय शिक्षण मंडळाकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा दावा केला जातो तर दुसरीकडे निकालाची टक्केवारी घटते, हा विरोधाभास का ? हा खरा प्रश्न आहे. यंदा अमरावती विभागात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ३२ हजार ४०५ विद्यार्थी आहेत. प्रथमश्रेणी व ६० टक्क्यांच्या पुढील ५५ हजार ८९२, द्वितीय श्रेणीतील ४५ टक्केपेक्षा अधिक ५० हजार ६१६ व ३५ टक्क्याच्यावर १२ हजार ८५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही बाब प्रशंसनीय असली तरी ही समाधानकारक नक्कीच नाही. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत अमरावतीचा ‘ग्रेड’ वाढविण्याचे लक्ष्य असायला हवे. दरवर्षी टक्केवारी वाढविण्यासाठी अमरावती विभागीय कार्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षकांना प्रशिक्षण देऊन गुणवत्ता विकास कार्यक्रम सुध्दा राबविण्यात आले आहेत. मात्र, तरीही अमरावती विभाग माघारला आहे. यातील नेमकी मेख शोधून काढण्याचे व त्यात सुधारणा करण्याचे आव्हान अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने स्वीकारावे.कॉपीबहाद्दरांना मदत करणारे २३ शिक्षकभलेही शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबविले. मात्र, तरीही ‘कॉपी’ ची प्रकरणे उघड झाली आहेत. दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी पुरविण्यासाठी तोतयागिरी करणारे एक प्रकरण उघड झाले आहे. तसेच तब्बल १५३ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे कॉपीबहाद्दरांना मदत करणाऱ्यांमध्ये २३ शिक्षकांचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्या शिक्षकांची चौकशी शिक्षण मंडळाने सुरु केली असून याप्रकरणाची शहानिशा करुन शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. गत वर्षाच्या तुलनेत विभागात निकालाची टक्केवारी वाढली आहे. येथे विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तरीही निकाल समाधानकारक आहे. गुणवत्ता वाढविण्यासाठी मंडळाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे दरवर्षीच टक्केवारी वाढत आहे. -प्रदीपकुमार अंभ्यकर, विभागीय सचिव (प्र)राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग माघारला आहे. मात्र, गुणवत्ता वाढली आहे. यंदाचा अमरावती विभागाचा निकाल समाधानकारक आहे. कॉपीमुक्त अभियान चांगल्याप्रकारे राबविले गेल्याने निकालाची गुणवत्ता वाढली आहे. -राम पवार,शिक्षण उपसंचालक.
राज्याच्या तुलनेत का माघारतोय अमरावती विभाग?
By admin | Updated: June 11, 2015 00:11 IST