विविध कार्यक्रम : वैराग्यमूर्तींचे महापौरांच्या हस्ते पूजनअमरावती : तहानलेल्यांना पाणी, भुकेल्यांना अन्न व बेघरांना निवारा, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश देणारे वैराग्यमूर्ती श्रीसंत गाडगे महाराजांचा ५९ वा पुण्यतिथी महोत्सव आठ दिवस उत्साहात अंबानगरीत साजरा होणार आहे. याकरिता संत गाडगेबाबा समाधी स्थळ अमरावतीच्यावतीने गाडगेनगरात विविध कार्यक्रम व गाडगे बाबांच्या जीवनचरित्र सांगणाऱ्या अनेक विचारवंतांचे व्याख्यान व कीर्तन येथे आयोजित करण्यात आले आहेत. १४ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे येथे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी गाडगेबाबांच्या समाधीस्थळी पूजन नगरसेवक बाळासाहेब भुयार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर रिना नंदा, एकनाथ ठाकूर, विवेक गोहाड, भागवताचार्य तुळशीदास महाराज, धर्माळकर, संजय कुकरेजा, शरद दातेराव, संस्थेचे विश्वस्त बापुसाहेब देशमुख आदी उपस्थित होते. सोमवारी श्रीमद् भागवत कथेचे वाचन करताना हभप तुळशीदास महाराज धर्माळकर यांनी गाडगेबाबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. आता संत गाडगेबाबांसारखा नि:स्वार्थी माणूस पुन्हा होणे नाही. आपण त्यांनी दिलेला संदेश अनमोल ठेवा म्हणून जपला पाहिजे. नवीन पिढीने त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
अंबानगरीत गाडगेबाबांचा पुण्यतिथी महोत्सव
By admin | Updated: December 15, 2015 00:16 IST