‘लोगो’ अनिवार्य : वाहनांवरही ‘सिम्बॉल’वापरण्याची सक्तीगणेश वासनिक - अमरावतीशासनाच्या सर्वच विभागांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, या अनुषंगाने बोधचिन्ह वजा ब्रिद वाक्य (लोगो) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या विभागाचे लोगो नाहीत, अशा विभागांच्या वरिष्ठांना हे 'लोगो' तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपरोक्त आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.शासनाचे २८ विभाग आणि १२ महामंडळ असलेल्या सर्वच प्रमुखांना आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘लोगो’ तयार करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या विभागांना ‘लोगो’ नाहीत, अशा विभाग प्रमुखांनी विभागाच्या कर्तव्यप्रणालीनुसार ‘लोगो’ तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यापूर्वी पोलीस, प्रादेशिक परिवहन महामंडळ, कारागृह प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग, आदिवासी विकास विभाग, राज्य परिवहन महामंडळ असे काही मोजकेच विभाग ‘लोगो’चा वापर प्रशासकीय कामकाज अथवा वाहनांवर ठळकपणे करीत होते. मात्र, आता शासनाने सर्वच विभागांना ‘सिम्बॉल’ अनिवार्य केले आहेत. तालुकास्तरावरील कार्यालय असो किंवा मुख्यालय, सर्वांनाच कामकाजात ‘लोगो’ अनिवार्य असेल. लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना ‘लोगो’ असलेले लेटरहेड अनिवार्य करण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या संबंधित विभागप्रमुखांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे नव्या शासन आदेशात सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.‘लोगो’ बघताच कागदपत्रे अथवा वाहन कोणत्या विभागाचे आहे, हे सामान्यांना कळले पाहिजे. त्यानुसार विभागाच्या कर्तव्यप्रणालीचा आधार घेत नवीन ‘लोगो’ तयार केले जात आहेत.‘लोगो’ तयार करताना त्या विभागाच्या कामकाजाशी निगडित बाबी बोधचिन्हात ठळकपणे अंकित व्हाव्यात, असे अपेक्षित आहे. कोणतीही कागदपत्रे, डायरी, अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार, शासनाला पाठविली जाणारी पत्रे आदींमध्ये त्या-त्या विभागाच्या ‘लोगो’चा अंतर्भाव यापुढे अनिवार्य असेल. नाव न वाचता केवळ ‘लोगो’ बघितला तर पत्र किंवा वाहने कोणत्या विभागाचे आहे, हे लक्षात यावे, यानुसार हे लोगो तयार केले जात आहेत.
-आता शासनाच्या सर्वच विभागांना स्वतंत्र ओळख
By admin | Updated: November 9, 2014 22:24 IST