शासकीय योजना : परस्पर साहित्याचे वाटपअमरावती : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवावा, यासाठी विविध योजना कृषी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जातात. मात्र याच विभागाच्या अभियांत्रिकिकरण योजनेच्या माहितीपासून जिल्हा परिषद कृषी सभापतीच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.राज्य शासनाच्यामार्फत जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून चौदाही पंचायत समित्यांमध्ये केंद्र पुरस्कृत अभियांत्रिकीकरण योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाणबुडी मशीन, पाईप, स्टार्टर, स्वीच बोर्ड असे साहित्य ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येते. यासाठी संबंधित शेतकरी लाभार्थ्यास १० टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. ही योजना जिल्हा परिषद कृषी विभागाच्या नियंत्रणात पंचायत समिती स्तरावर राबविली जात आहे. मात्र ही योजना राबविताना जिल्हा परिषद कृषी सभापती महेंद्रसिंग गैलवार व विविध पंचायत समितीचे सभापती, केंद्र पुरस्कृत अभियांत्रिकीकरण योजनेपासूनच अनभिज्ञ आहेत. या योजनेच्या कुठल्याही निकषाची व योजनेची माहितीच नसल्याचे कृषी सभापती गैलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असली तरी योजना लाभार्थ्यांपर्यंत कृषी विभागाचे अधिकारीच परस्पररित्या पोहचवित असून त्यांना साहित्य पुरवठाही करीत असल्याने सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना लाभार्थ्यांसाठी फायद्याची आहे.
अभियांत्रिकी योजनेबाबत कृषी सभापती अनभिज्ञ
By admin | Updated: July 8, 2014 23:13 IST