लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा शहरात चांगलाच शिरकाव झालेला आहे. सोमवारी दुपारच्या अहवालानुसार, मसानगंजमध्ये एक व लालखडीमध्ये चार व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये चार पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १११ वर पोहोचली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेने सोमवारी दुपारी दिलेल्या अहवालानुसार, मसानगंज येथील २२ वर्षीय तरुणाच्या घशातील स्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याच परिसरातील संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात तो आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मसानगंजमध्ये एकाच कुटुंबाच्या संपर्कातील व्यक्ती संक्रमित निष्पन्न झाल्या असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. याशिवाय लालखडी परिसर हा नवा ‘कोरोना हॉटस्पाट’ होत आहे. सोमवारच्या अहवालात १२ वर्षाची मुलगी, २३ वर्षाचा युवक तसेच ३० व ३२ वर्षाच्या तरुण व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. या रुग्णांना कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या कोरोनाग्रस्तांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. सॅनिटायझरची फवारणी या भागात करण्यात आली आहे. हा भाग यापूर्वीच्या कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने आशा व एएनएम पथकांचे सर्वेक्षण या भागात सुरू असल्याची माहिती महापालिका पथकाने दिली.कोरोनाची जिल्हा स्थितीविद्यापीठ प्रयोगशाळाद्वारे सोमवारी ८३ अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार पाच रुग्ण कोरोना संक्रमित आहेत, ७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, सोमवारी ५४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ११ हजार ३८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोमवारी १३८ नमुने व आतापर्यंत २६८८ नमुने तपासणीसाठी लॅबकडे पाठविण्यात आले. त्यापैकी २३३६ निगेटिव्ह, तर १११ पॉझिटिव्ह आले आहेत. १७४ पुनर्तपासणीकरिता पाठविले. १३ रुग्ण दगावले आणि ६२ व्यक्ती उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.