अमरावती : पोलीस भरती प्रक्रिया शिस्तबध्द व पारदर्शक होण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी पध्दतशीर नियोजन केले आहे. त्याकरिता आठ तास पोलिसांचा चोख बंदोबस्त सुध्दा लावला. मात्र, भरती प्रक्रियेत सेवा दिल्यानंतरही पोलिसांना नाकाबंदीची जबाबदारी सोपविली जात असल्यामुळे कर्मचारी वैतागले आहेत. २९ मार्चपासून शहर, ग्रामीण व एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडत आहे. भरतीदरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तिला मैदानात प्रवेश नसून प्रवेशद्वारावर पोलीस तैनात आहेत. प्रत्येकाची नोंद घेणे, ओळखपत्र लावणे, अशा बाबींकडेही विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांना भरतीप्रक्रिया सुरु होण्यापूर्वी अर्धातास आधीच हजर राहण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे पोलिसांना वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत पोलीस भरतीप्रक्रियेत व्यस्त असतात. मात्र, हे काम संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना नाकाबंदीची अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागते. आठ तास सेवा दिल्यानंतर आणखी दोन तास पोलिसांना नाकाबंदीचे काम करावे लागते. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करताना पोलिसांची दमछाक होत आहे.चालान बुक केव्हा?४वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांजवळचे चालान बुक काढून घेण्यात आल्याने टगेखोर वाहनचालक या पोलिसांना टाटा-बाय-बाय करीत निघून जातात. चालान बुक नसल्याने एका छोट्या रजिस्टरवर संबंधित वाहनचालकाची नोंद करण्यापर्यंत वाहतूक पोलिसांचे काम मर्यादित झाले आहे. चालान बुक नसल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दंड सुध्दा देता येत नाही. पोलीस भरतीत दिवसभर काम नसते. काही वेळ पोलिसांना विश्रांती मिळतेच. भरतीप्रक्रियेत पोलिसांसाठी जेवण, नाश्ता, चहापाण्याची सर्व सोय करण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर तासभर नाकाबंदीचे काम दिले जात आहे. ही जबाबदारी पार पाडणे त्यांच्यासाठी काही अवघड नाही. - मोरेश्वर आत्राम,पोलीस उपायुक्त.
भरती बंदोबस्तानंतर पोलिसांवर नाकाबंदीचीही जबाबदारी
By admin | Updated: April 4, 2016 00:38 IST