राज्य विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी घोषित झाला. २७ मे २0१४ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची ३ जून ही अंतिम मुदत आहे. २0 जूनला मतदान व २४ जूनला मतमोजणी होईल. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात बुधवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
१६
मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर जिल्ह्यातील आचारसंहिता संपुष्टात आली होती. त्यानंतर पुन्हा आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य विधानसभेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची मुदत १९ जुलै २0१४ रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने या मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर केला. अमरावती विभागात ४२ हजार शिक्षक मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात १६ हजार शिक्षक मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच निवडणुकीची आचारसंहिता राहणार आहे. विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपायुक्त माधवराव चिमाजी हे उपनिवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत राहणार आहे. इयत्ता ५ ते १0 वीच्या विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक मतदार राहणार आहेत.