अमरावती : नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा डफरीन रूग्णालयातील कारभार 'लोकमत'ने पुराव्यासह लोकदरबारात मांडल्यानंतर पायाखालची वाळू सरकलेल्या अधीक्षक डॉ.अरूण यादव यांनी चूक लपविण्यासाठी मानवतेचाच मुडदा पाडला. 'नवजाताचा पलंगावरून पडून मृत्यू' हे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची संवेदनशीलपणे दखल घेऊन डॉक्टर असलेले अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांनी जिल्हा स्त्रि रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तातडीची बैठक बोलविली. डफरिनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण यादव त्यांच्या चमूसह उपस्थित होते. नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे वास्तव लपविण्यासाठी डॉ.यादव यांनी सुनील देशमुख यांना 'थंड डोक्या'ने दिशाभूल करणारी माहिती दिली. क्षणभर सुनील देशमुखांचाही डॉ.यादवांनी दिलेल्या माहितीवर विश्वास बसला, इतक्या सुनियोजितपणे खोटी माहिती सादर करण्यात आली. खोटे काय? अचलपूरच्या कासमपुरा परिसरातील राणी राऊत यांची प्रसुती नव्हे, तर गर्भपात करण्यात आला. त्यामुळे त्यांचे नवजात अर्भक पलंगावरून पडून दगावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी माहिती डॉ. यादव यांनी आमदारांना दिली. खरे काय? प्रत्यक्षात राणी राऊत यांना सातव्या महिन्यांत असह्य प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. वारंवार याचना करूनही डॉक्टर, परिचारिकांनी जराही लक्ष दिले नाही. राणी प्रसूत होण्याची चिन्हे दिसू लागल्यावर राणी यांच्या सासूबार्इंनी प्रसुतीसाठीचे परंपरागत बाह््य उपचार केलेत. डॉक्टर्स, नर्सेसविनाच राणी प्रसूत झाल्यात. सात महिन्यांचे जिवंत बाळ सुखरूप बाहेर आले. नंतर डॉक्टरांच्या देखरेखीत असताना राणी यांचे बाळ पलंगावरून पडले नि दगावले. राणी यांचे पहिले मूलही सातव्या महिन्यातीलच आहे. ते उत्तम आहे. दुसऱ्या खेपेसही राणी यांना सातव्या महिन्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. प्रकरण दुसरे: यादवांचा खोटारडेपणारिझवाना बी जावेद शहा (२४, रा. रहेमतनगर) यांना प्रसुती कळा आल्याच नाहीत. त्यांना इतर आजार असल्याने मृत्यू बाळ जन्माला आले, अशी माहिती दिली. असे आहे वास्तव!रिझवाना यांना घटनेच्या एक दिवस आधीच डफरीनमध्ये दाखल करण्यात आले होते. असह्य वेदनांनी त्या तडफडत होत्या. सिझेरियन करून टाका, अशी गयावया वारंवार करीत होत्या. डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत. बाळ दगावले. आदल्या दिवशी, योग्य वेळेत प्रसुती करविली असती तर बाळ सुखरूप असते, असे रिझवानाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ( प्रतिनिधी)
नवजातांच्या मृत्यूनंतरही डॉक्टरांचा किळसवाणा बचाव?
By admin | Updated: November 15, 2014 01:07 IST