सीईओंचे आदेश : कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल अमरावती : शालार्थ वेतनप्रणाली अंतर्गत शिक्षकांची नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांची वेतनदेयके विलंबाने सादर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी ३० डिसेंबर रोजी दर्यापूर व चांदूररेल्वे पंचायत समितीमधील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याने या विरोधात सोमवारी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाची दखल घेत सीईओंनी दर्यापूर पं.स.मधील पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन आदेश मागे घेतले. आहेत. यामध्ये कनिष्ठ सहायक राहुल प्राणकर, वरिष्ठ सहायक पी.एस.साखरे, वरिष्ठ सहायक व्ही.बी.देशमुख तर चांदूररेल्वे पं.स.मधील कनिष्ठ सहायक अनिल राऊत व कनिष्ठ सहायक अरविंद चिंचमलातपुरे या पाच निलंंबित कर्मचाऱ्यांची अॅडिशनल सीईओ प्रकाश तट्टे यांच्यामार्फत सुनावणी घेतली. पाचही कर्मचाऱ्यांनी यावेळी भविष्यात अशी चूक न करण्याचे मान्य केले तसेच वेतनाच्या कामात दिरंगाई होणार नाही, अशी हमी दिल्याने सीईओ किरण कुलकर्णी यांनी एका लेखी आदेशाव्दारे दर्यापूर व चांदूररेल्वे या दोन पंचायत समितींमधील पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. तसेच यापाचही कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या ठिकाणी स्थापित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे सोमवारी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्या नेतृत्वात डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांना निलंबन मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर निलंबन आदेश मागे घेण्याचे आदेश मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, सचिव संजय राठी, कार्याध्यक्ष संजय येवतकर, उपाध्यक्ष अविनाश हुसे, कोषाध्यक्ष शिल्पा काळमेघ, संघटक समीर चौधरी, ज्ञानेश्वर घाटे, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, प्रशांत धर्माळे, अमोल कावरे, लिलाधर नांदे, समीर लेंडे, नीलेश तालन सहभागी झाले होते.
अखेर ‘त्या’ पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे
By admin | Updated: January 3, 2017 00:14 IST