धारणी : येथील कोविड केअर सेंटरमध्ये तात्पुरती नोकरी लावण्याकरिता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने आदिवासी युवकांकडून प्रत्येकी १२ हजार रुपये उकळल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्या वृत्ताची दखल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी घेतली. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना चौकशीचे निर्देश दिले. त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पांडे यांच्याकडे सोपविली आहे.
धारणी शहरातील कोविड केअर सेंटरवर ११ महिन्यांचे काम आहे, तेथे तुम्हाला नोकरीवर लावून देतो, असे सांगून तालुका आरोग्य विभागातील कर्मचारी गायगोले यांनी अजय डहाके व संजू कासदेकर यांच्याकडून प्रत्येकी १२ हजार रुपये घेतले. याची माहिती दोघांनीही ‘लोकमत’ला दिली. वृत्त प्रकाशित होताच धारणी तालुका आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातूनदेखील याबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.