विशेष शिबिर : ३१ डिसेंबरनंतर कर भरल्यास दरमहा दोन टक्के व्याजअमरावती : महापालिका उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासनाने कर वसुलीचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. मार्च अखेरपर्यंत ४४ ते ४५ कोटी रुपये मालमत्ता कराचे वसूल होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.महापालिका अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे ५० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र १० डिसेंबरपर्यत मालमत्ता करातून १२.५० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे. मालमत्ता कराची वसुली वाढविण्यासाठी मुल्य निर्धारक व कर संकलन विभागाने पाचही झोन निहाय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात दीड लाख मालमत्ता असून थकीत करदात्यापर्यंत कर वसुली लिपीक पोहचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. डिसेंबरनंतर मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी सुटीच्या दिवशी विशेष शिबीर, कर भरण्यासाठी आॅनलाईन सुविधा, किआॅक्स मशीनवर कर भरण्याची सोय, कर लिपीक नागरिकांच्या दारी उपक्रम, भ्रमणध्वनीवर कॉल करा आणि कर भरा अशा विविध उपक्रमातून नागरिकांपर्यत पोहचण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. डिसेंबर अखेरपर्यत नागरिकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा, यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यात कर वसुलीसाठी जोरकसपणे प्रयत्न करुन बजेटमध्ये तरतुदीनुसार कर वसुलीवर भर राहणार आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या नवीन आणि अतिरिक्त मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या मालमत्तांवर दंडात्मक कारवाई ६ पट कर आकारणी करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. मात्र सभागृहात सहापट कर आकारणीबाबत एकमत झाले नाही, हे विशेष. तरिदेखील प्रशासनाकडून सहापट दंडात्मक कर वसूल केला जात आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’
By admin | Updated: December 11, 2015 00:39 IST