अमरावती : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत 'अॅक्शन प्लॅन' तयार करून तो राज्य व केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे. या माध्यमातून टप्प्याटप्प्याने संपूर्ण अमरावती जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे यांनी शौचालय बांधकामाचा उपक्रम सुरू केला आहे. सध्या ग्रामीण भागात शौचालयाबाबत जनजागृती करण्यावर अधिक भर आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या तब्बल ७० टक्के लोकांकडे शौचालयाचे काम पूर्णत्वास येत आहे. उर्वरित साधारणत: अडीच लाख लोकांकडे आजही वैयक्तिक शौचालय नाही. परंतु या लोकांकडे जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सीईओंनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधकामाचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी लाभार्थ्यांना तब्बल १२ हजार रूपये प्रोत्साहन म्हणून दोन लाख शौचालयाची उद्दिष्टपूर्ती बऱ्याचपैकी झाली आहे. उर्वरित शौचालयांच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कक्षाच्यावतीने अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. या अॅक्शन प्लॅननुसार पुढील तीन वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
हागणदारीमुक्तीसाठी आता 'अॅक्शन प्लॅन'
By admin | Updated: March 1, 2015 00:24 IST