११ वाजता शहरांतील दुकानांना टाळे
अचलपूर : कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्यात लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी अचलपूर पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. परिणामी बुधवारी दुपारी ११ वाजता दुकानांना टाळे लागल्याचे चित्र होते.
राज्य शासनाने कलम १४४ लागू केले असून, सकाळी ७ ते ११ अशी अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ ठरविली आहे. त्यानुसार अचलपूर पोलीस रस्त्यावर उतरताच किराणा, भाजीपाला, दूध डेअरी आणि इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने ११ वाजता बंद करण्यात आली. रस्त्यावर अकारण फिरत असलेले तसेच विनामास्क नागरिकांनी पोलिसांना पाहताच पळ काढला. अचलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चावल मंडी, झेंडा चौक, देवडी, बुद्धेखा चौक, बिलनपुरा या भागांतील अत्यावश्यक सेवांसाठी सुरू असलेली दुकाने सकाळी ११ वाजता बंद करण्यात आली.