अचलपूर : तालुक्यातील विविध गावांतील २८ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकांना सुरूवात झाल्याने सहकार विभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकाही रंगात आल्या आहेत. त्यासाठी निवडणुकांची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. या महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. शहरासह तालुक्यातील परसापूर, वडनेर, भूजंग, धामणगाव गढी, रासेगाव, श्यामपूर, अंबाडा, बोरगाव, अचलपूर, प्रागतिक हायस्कूल, जगदंब सह कर्मचारी पतसंस्था, जगदंब विद्यार्थी सहकारी भंडार, म्युनिसिपल क्रेडिट कर्मचारी सो. सा. विद्युत कामगारांसह पतसंस्था, इत्यादी ठिकाणची जबाबदारी व्ही.ए.पांडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जानेवारीअखेर निवडणुकाजी.एन. डिके यांच्याकडे चमकखुर्द, धोतरखेडा, कुष्ठा येथील दोन संस्था, कांडली पोही, सालेपूर, एकलासपूर येथील निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गडलिंग यांच्याकडे रामानंद, बोपापूर, देवगाव, जवर्डी, केशवानंद, सावळापूर, भूगाव, चमक बु. निजामपूर, नायगाव, जयसिंग, पथ्रोट आदी सोसायटींच्या जबाबदारी सहायक निबंधक एस.टी. केदार यांनी सोपविली आहे.या निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रात राहून राजकारण करणारे नेते कामाला लागले आहे. तालुक्यातील तीन सहकारसम्राट आपल्या गटाच्या ताब्यात सहकार संस्था कशी राहील, यासाठी प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीत उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सोडत आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अर्ज मागे घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग काही पुढाऱ्यांनी सुरू केले आहेत. वडनेर, भूजंग, जगदंब प्राथमिक, शिक्षक पतपेढी, कांडली व सलेपूर येथे १३ संचालक असून या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
अचलपुरात सहकार क्षेत्रातील निवडणुकीची रणधुमाळी
By admin | Updated: January 6, 2015 22:52 IST