तक्रार : माजी सरपंचाने दिले निवेदन अचलपूर : गोरगरीब, दलित, शेतकरी, शेतमजूर आदी गरजू लोक कर्ज मागायला बँकेत गेल्यास युनियन बँक आॅफ इंडियाचे शाखाधिकारी यांना हाकलून लावतात. एजंटमार्फत गेल्याशिवाय कर्जाचे काम होत नाही, असा आरोप असदपूर येथील माजी सरपंच दिलीप राऊत यांनी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार व बँकेचे महाव्यवस्थापक मुंबई यांना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे. असदपूर येथील युनियन बँक आॅफ इंडियाची शाखेतून गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, दलित आदी गरजू लोक कर्जाची उचल करतात. परिसरात दलाल सक्रिय असून त्यांचेमार्फत गेल्याशिवाय गरजूला कर्ज मिळत नाही. एखादा व्यक्ती कर्ज मागण्यासाठी गेल्यास समाधानकारक उत्तरे न देता उद्धटपणाने बोलून हाकलून लावतात. त्यामुळे या भागातील लोक त्रस्त झाले आहेत. तरी येथील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असेही राऊत यांनी निवेदनात नमूद केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना विविध बॅकेकडून नाहक त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही (शहर प्रतिनिधी) बॅकेतील कर्मचाऱ्यांचीही चुप्पी याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी असदपूर येथील बँकेत संपर्क साधला असता शाखाधिकारी आज बुधवारी सुटीवर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही. बाकी कर्मचारी मात्र यावरच काहीच बोलण्यास तयार नव्हते.
युनियन बँकेत गरिबांना अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:26 IST