जिल्हाधिकारी : नागरिकांनी व्यक्त कराव्यात स्वातंत्र्याविषयी भावनाअमरावती : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारा ९ ते १५ आॅगस्ट दरम्यान ‘कलर्स आॅफ इन्डीपेडन्स’ (रंग स्वातंत्र्याचे) हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सप्ताहादरम्यान शहरात प्रमुख ठिकाणी लावण्यात येणाऱ्या कॅनव्हासवर नागरिकांनी रंगाद्वारे भावनांचे प्रगटीकरण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.राष्ट्रीय वस्त्रोद्योग कंपनीद्वारा अचलपूर येथील फिनले मिल ही या उपक्रमाची नोडल एजन्सी आहे. हा सप्ताह साजरा करण्यासाठी देशभऱ्यातील ७० व राज्यातील ६ शहरामध्ये अमरावती शहराचा समावेश आहे. राज्यात अमरावतीसह मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व वर्धा शहरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरात मंगळवारी राजकमल चौकात १२ बाय ९ फुट आकाराचे कॅनव्हास लावून या सप्ताहाचे रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच शहरात पंचवटी चौक, शिवटेकडी, राजापेठ, विमवि व इंजिनिअरिंग कॉलेज व विद्यापीठ परिसरात कॅन्व्हास लावण्यात येणार आहे. या ठिकाणी रंग, ब्रश, डाय आदी साहित्य ठेवण्यात येणार आहे. यावर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य, लोकाशाही आदीविषयी देशप्रेमाच्या भावना अंकित करायच्या आहेत. किती नागरिकांनी सहभाग नोंदविला याविषयीचा अहवाल रोज केंद्रीय मंत्रालयाला पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. यावेळी एनटीसीचे मिश्रा व जिल्हा खादी उद्योग केंद्राचे प्रकल्प प्रमुख प्रदीप चेचरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
९ ते १५ आॅगस्टदरम्यान ‘रंग स्वातंत्र्याचे’ सप्ताह
By admin | Updated: August 9, 2016 00:06 IST