व्यावसायिकांमध्ये खळबळ : १५ दिवसांत प्रत्यक्ष ताबा घेणार, आयुक्तांचे निर्देशअमरावती : महापालिकेला ठेंगा दाखवीत सुमारे दीड कोटी रुपयांचा कर चुकविणाऱ्या ८९ मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. मंगळवारी यासंदर्भात आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. या निर्णयाने एमआयडीसी वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या ८९ मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता व्यापक कालावधी देण्यात आला होता. मात्र, त्या कालावधीत त्यांनी कराचा भरणा न केल्याने संबंधित मालमत्तांचा १५ दिवसांमध्ये प्रत्यक्ष ताबा घेतला जाणार आहे. एमआयडीसी आणि सातुर्णा एमआयडीसीतील ८९ मालमत्ता धारकांनी मागील अनेक वर्षांपासून महापालिकेला सहकार्य न करता कोट्यवधींचा कर थकविला आहे. त्या अनुषंगाने ७ जून २०१६ ला उपायुक्त प्रशासन यांच्या कार्यालयात या मालमत्ताचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र, संबंधित मालमत्तेची बोली लावण्यास कोहीही समोर न आल्याने या मालमत्ता महापालिकेच्या नावे लावण्यासंदर्भात आदेश काढण्यात आले. त्याचवेळी या औद्योगिक मालमत्ताधारकांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडे विनंती आणि पत्रव्यवहार केला. त्यानुसार त्यांना थकीत कर भरण्यासाठी काही अवधी देण्यात आला. त्याचवेळी त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, गेल्या पाच महिन्यांनंतरही या मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही. महापालिकेच्या नोटीसीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे आयुक्तांनी या ८९ मालमत्ताचा प्रत्यक्ष ताबा घ्यावा, असे निर्देश कर विभागाला दिले आहे. बरहुकूम १५ दिवसात प्रशासनातर्फे प्रत्यक्ष ताब्याची कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
एमआयडीसीतील ८९ मालमत्ता जप्त
By admin | Updated: October 26, 2016 00:16 IST