जरूड : स्थानिक उत्क्रांती शाळेत आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ८० टक्के हजेरी लागत आहे. १५ जुलैला शासकीय आदेशाने शाळा सुरू झाल्या तेव्हा शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. शाळा सुरू करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली शाळा समितीने पालकांची संमती मिळविली.
सरपंच सुधाकर मानकर यांच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करणारी जिल्ह्यातील जरूड ही पहिली ग्रामपंचायत व उत्क्रांती ही पहिली शाळा ठरली. पालकांचा शाळेला प्रतिसाद मिळत आहे. सरपंच मानकर, केंद्रप्रमुख, शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, पटवारी, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, गावकरी या सर्वांच्या सहकार्याने १५ जुलैपासून शाळेला सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. याप्रसंगी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष देविसिंह खुटपळे, सचिव रामचंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये याकरिता कोणती काळजी घ्यावी, याबाबत डॉ. आकाश देशमुख, डॉ. समाधान तायडे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. सरपंच सुधाकर मानकर यांनी कोरोनाकाळात जनजागृती करून नागरिकांना सुरक्षित ठेवले तसेच शाळेतदेखील वारंवार सॅनिटायझेशन करून दिले. विद्यार्थी सुरक्षित राहावा, यासाठी शाळा प्रशासन प्रयत्नशील राहील, असे मत देविसिंह खुटपले यांनी मांडले. या कार्यक्रमाला रामचंद्र पाटील,रामकृष्ण मेश्राम, भीमराव हरले आदी संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.के. गोडबोले यांनी केले.