संथगतीने प्रक्रिया : मागील वर्षीपेक्षा टक्का घसरलाअमरावती : महसूल विभागामार्फत राज्य शासनाच्या तिजोरीत सर्वाधिक भर ही महसुली उत्पन्नातून पडते. जिल्हा महसूल विभागाने मागील वर्षी ५८.७६ कोटी रूपयांचा महसूल गोळा केला होता. मात्र यंदा सुरूवातीला आठ महिन्यांत केवळ १५ कोटी ३४ लाख रुपयांची (१७.८४ टक्के) वसुली होऊ शकली. येत्या तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्तीसाठी सुमारे ७१ कोटी रूपये वसुलीचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.महसूल विभागातील राजस्व, खनिज उत्खनन व मनोरंजन आदी तीन विभागांमार्फत महसूल उत्पन्न सर्वाधिक मिळते. यामध्ये अकृषक जमीन, नझूल जमीन, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका उपकर दुसऱ्या विभागात खनिज उत्खनन आणि तिसऱ्या विभागात मनोरंजन कराचा समावेश आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून एकूण ५८ कोटी ७६ लाख २९ हजार रूपये वसुली झाली आहे. आता आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरच्या तीन महिन्यांत महसूल विभागाकडे ८६ कोटीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महसूल विभागाला सर्व तालुक्यातून ७१ कोटींची वसुली करावी लागणार आहे. त्यामुळे महसूल विभागात विविध कामांचा ताण लक्षात घेता महसूल वसुलीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. महसूल वसुलीसोबतच कायदा, सुव्यवस्था राखणे, मंत्री व अन्य व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याची जबाबदारी, याशिवाय पूर दुष्काळाचे सर्वेक्षण करून त्याची माहिती देणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडून प्रशासकीय कामे पूर्ण करावे लागते. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरीस १५ कोटी ३४ लाख २९ हजार रूपयांची महसूल वसुली झाली होती. यंदा मात्र महसूल वसुलीसाठी ८६ कोटींचे उद्दिष्ट आहे. तर मागील वर्षी ६५ कोटींच्या उद्दिष्टांपैकी ५८ कोटी ७६ लाख एवढा महसूल गोळा करण्यात महसूल विभागाला यश आले होते. (प्रतिनिधी)
तीन महिन्यांत ७१ कोटींचे उद्दिष्ट
By admin | Updated: December 25, 2014 23:24 IST