१२ जणांना पारितोषिक : आयएम व जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे आयोजन अमरावती : इंडियन मेडिकल असोशिएशन व जिल्हा एड्स नियंत्रण कक्षातर्फे मंगळवारी सकाळी आयोजित मॅराथॉनमध्ये ७०० नागरिकांनी एड्स जनजागृतीसाठी धाव घेतली. यामध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा गौरव जोगी याने प्रथम स्थान मिळविले. १२ जणांनी पारितोषिके पटवलीत. आयएमए यांच्या परिषदेच्या अनुषंगाने एड्सबाबत जनजागृती करण्यात आली असून मंगळवारी सकाळी ७ वाजता आयएमएच्या कार्यालयापासून मॅराथॉनला सुरुवात करण्यात आली. एड्स आजार समजून घ्या, एड्स टाळा, सुदृढ भारतीय संपन्न भारत, चालत रहा स्वस्थ रहा, अशा विविध प्रकारचे स्लोगनवरून मॅराथॉनमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी शहरातील डॉक्टरांसह मोठ्या संख्येने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अप्पर जिल्हाधिकारी तुषारसिंग परदेशी, विदर्भ युथ वेलफेअर सोयायटीचे अध्यक्ष नितीन धान्डे, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, हव्याप्र मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, पी.आर. सोमवंशी, श्रीपाद जहागीरदार, उदय मांजरे, आयएमए परिषदेचे अध्यक्ष जयंत पांढरीकर, अतुल पाटील, आशिष डगवार, विजय बोथरा आदिंनी हिरवी झेंडी दाखवून मॅराथॉनला सुरुवात केली. आयएमए हॉलपासून निघालेली मॅराथॉन बियाणी चौक, विभागीय आयुक्त कार्यालय, पावर हाऊस वेलकम पार्इंट, पंचवटी, इर्विन चौक या मार्गाने नेऊन पुन्हा आयएमए हॉलसमोर समापन करण्यात आली. यामध्ये सर्वात प्रथम १८ मिनीट २२ सेकंदात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा गौरव जोगी पोहोचला. त्यानंतर पोहोचलेल्या ६ पुरुष व सहा महिलांना आयोजकांतर्फे पारितोषिके प्रदान करण्यात आलीत. या ७.५ किलोमीटर मॅरॉथॉनमध्ये डॉक्टर, युवक, अधिकारी व विद्यार्थ्यांनी एडसबाबत जनजागृती केली असून या मॅराथॉनकडे अमरावतीकरांनी लक्ष वेधले होते. (प्रतिनिधी)
एड्स जागृतीसाठी धावले ७०० नागरिक
By admin | Updated: December 2, 2015 00:19 IST