वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून, आठवड्याभरात एकूण ५७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्याअनुषंगाने तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी पंचायत समिती आरोग्य विभाग व नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक घेऊन सर्व रुग्णंना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेले कोरोना संक्रमित हे सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शहरात विनामास्क बाहेर फिरणाºयांवर कारवाईचा दणका सुरू आहे. ग्रामीण भागात मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्याकरिता पंचायत समिती विभाग व आरोग्य विभागाला धारेवर धरून नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करावी. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यास कुणाचीही हयगय केली जाणार नाही. कोरोना संक्रमित गावात आढळल्यास कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याचे आदेश दिले आहे. जर होम आयसोलेटेड रुग्ण गावात फिरत असेल, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. गृह विलगीकरण करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाºयांचे पत्र असणे आवश्यक आहे.
- तर समितीवर कारवाई
कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक गावात एक समिती तयार करण्यात आली. त्या समितीने कोरोना काळात सहकार्य केले नाही, तर कारवाई करण्याची सूचना तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी दिली आहे.