चित्रांश कंपनीविरोधात बैठक : पोलीस आयुक्तांना देणार निवेदनअमरावती : ३५ हजार रुपयांत टीव्ही देऊन व्यापारी प्रतिष्ठानात चित्रांश कंपनीची जाहिरात करा, असे आमिष दाखवून कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील ५०० व्यापाऱ्यांची सुमारे २१ कोटींनी फसवणूक केल्याचा प्रकार रविवारी व्यापारी वर्गाच्या बैठकीत उघडकीस आला. याप्रकरणी काही व्यापाऱ्यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आता व्यापारी वर्ग पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. चित्रांश कंपनीच्या सदस्यांनी शहरातील ५०० च्या आसपास व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ३५ हजार रुपये प्रमाणे पैसे घेतले. या पैशातून व्यापाऱ्यांना एक टीव्ही देऊन त्यावर केवळ कंपनीची जाहिरात राहील. अशा सूचना दिल्यात. त्यासाठी व्यापाऱ्यांना दरमहिन्याला ६ हजार रुपयांप्रमाणे सहा महिने पैसे देण्याची बतावणी कंपनीने केली. तसेच त्यापुढील सहा महिन्यांत आणखी एक हजार रुपये वाढवून देऊ व २४ महिन्यांनंतर दरमहा १० हजार रुपये देण्यात येईल, असे आमिष दाखविले होते. आमिषाला बळी पडून शहरातील ५०० च्याजवळपास व्यापाऱ्यांनी चित्रांश कंपनीत गुंतवणूक केली. त्यामध्ये काही व्यापाऱ्यांना टीव्ही देण्यात आले असून दोन ते तीन महिन्यांपर्यंत पैसेसुध्दा देण्यात आले. तर काही व्यापाऱ्यांना देण्यात आलेले धनादेशही अनादरणही झालेत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात आले. यापैकी काही व्यापाऱ्यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रविवारी मच्छीसाथ येथील राजेश व्यास यांच्या प्रतिष्ठानात व्यापारी वर्गाने बैठकीचे आयोजन केले होते. तेथे सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन फसवणूकीसंदर्भात चर्चा केली. चर्चेमध्ये झालेल्या निर्णयानुसार व्यापारी वर्ग पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना निवेदन सादर करुन कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. यावेळी चंद्रकांत खिडके, प्रविण गणवीर, नवनाथ सुरेखा, राजेश गुल्हाने, पियुष शाह, शंकर भुतडा यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये खादी भंडारचे संचालक तरुण शर्मा, राजेश व्यास, सईद खान, किशोर पांडे, प्रकाश वाघवाणी, गजानन पंतगराव आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी)
५०० व्यापाऱ्यांची २१ कोटींनी फसवणूक
By admin | Updated: July 27, 2015 00:28 IST