पहिला पेपर मराठीचा : जिल्ह्यात पाच भरारी पथकेअमरावती : विद्यार्थ्याच्या करिअर मधील महत्त्वाचा पहिला टप्पा असलेली इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार १ मार्चपासून सुरू होत आहे. अमरावती विभागातून सुमारे १ लाख ७७ हजार २८० नियमित तर १० हजार ५१९ पुनर्परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विभागात सर्वाधिक ४४ हजार ५५१ नियमित विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील आहेत. परीक्षार्थ्यांसाठी जिल्ह्यात १९४ परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. अलीकडे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचा ट्रेंड सुरू झाला असला तरी दहावीच्या परीक्षेचे महत्त्व अद्यापही कायम आहे. १ ते २९ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. विभागातून ८२ हजार ४३७ मुली आणि ९४ हजार ८४३ मुले ही परीक्षा देतील. पाचही जिल्ह्यातून ७ हजार ६७५ मुले आणि २ हजार ८४४ मुली पुनर्परीक्षार्थी आहेत. मंगळवारी मराठी विषयाच्या पेपरने दहावीच्या परीक्षेचा श्रीगणेशा होईल. उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी विभागात ७३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. भरारी पथकांचा कॉपीवर ‘वॉच’बोर्डाच्या परीक्षेदरम्यान हमखास होणारे कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विविध परीक्षा केंद्रांवर भेटी देण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शहरी भागातील कॉपीचे प्रमाण या उपाययोजनांमुळे कमी झाले आहे. परंतु ग्रामीण भागातील कॉपीचे प्रकार थांबविण्यावर मंडळाचा सर्वाधिक भर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत परीक्षा केंद्रांमध्ये सातने वाढ झाली आहे. परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी मंडळाने केली आहे. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल. परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सीईओ, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एव्हाना घरोघरी लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. यंदा विज्ञानचे दोन पेपरगतवर्षी दहावी परीक्षार्थ्यांसाठी विज्ञान या विषयासाठी एकच पेपर घेण्यात आला. यंदा मात्र विज्ञान- १ आणि विज्ञान- २ असे दोन स्वतंत्र पेपर घेण्यात येणार आहेत. यंदाच्या परीक्षा प्रक्रियेमधील हा महत्त्वाचा बदल आहे. विभागातील ६८३ केंद्रावरून १,८७,७९९ विद्यार्थी १० वीची परीक्षा देणार आहेत. गुणवत्ता वाढीस लागल्याने कॉपीला आळा बसला आहे. कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार आहे.- संजय यादगिरे,सचिव, शिक्षण मंडळ, अमरावती
दहावीचे ४४ हजार परीक्षार्थी
By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST