अमरावती : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी व दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात महावितरणचेदेखील मोठे नुकसान झाले. या परिसराचा खंडित झालेला वीजपुरवठा लवकरच सुरळीत होईल तसेच आता अंडरग्राऊंड पद्धतीने वीजवाहिन्या टाकून पुरवठा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
रविवारी सायंकाळी अमरावती दौऱ्यावर आले असताना ना. नितीन राऊत यांनी विश्रामगृहात पत्रकारांंशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी ३८०० कोटी रुपये भूमिगत वीजवाहिन्यांच्या जाळ्यासाठी जाहीर केले. हे काम नव्याने करावे लागेल. पुरामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता पुढे असे नुकसान होणार नाही, ही काळजी या भूमिगत वाहिन्यांच्या कामातून घेऊ, असंही राऊत यांनी सांगितले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पश्चिम बंगालमधून कामगार मागविले आहेत. मंगळवारी महाड येथील दौरा करून नुकसानाची पाहणी करू तसेच इतर भागाचा दौरा कॅबिनेट बैठकीनंतर करू, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या काँग्रेसनगर स्थित निवासस्थानी भेट दिली. त्यांनी दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई आणि कुटुंबीय तसेच महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे आदी उपस्थित होते.