पोलीस आयुक्तांची माहिती : ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्नअमरावती : शहरातील विविध परिसरातील धार्मिक स्थळांपैकी ३४३ धार्मिक स्थळांना नियमानुसार ध्वनिक्षेपक वाजविण्याची परवानगी पोलीस विभागाने दिली आहे. पोलीस विभाग उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत प्रयत्न करीत आहेत. अमरावती शहरात ४७८ धार्मिक स्थळे सायलेंट झोनमध्ये असल्याचे महानगरपालिकेने घोषित केले आहे. त्यामुळे सायलेंट झोन परिसरात ध्वनी प्रदूषणावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आला आहे. सोबतच सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाला काही मर्यादा आखून देण्यात आल्या आहेत. ध्वनीप्रदूषण अधिनियमांचे उल्लंघन झाल्यास पोलीस विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सण व उत्सवाच्या कार्यक्रमात केवळ दोन स्पिकर्स लावण्याची परवानगी पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता कार्यक्रमात ढोल-ताशे, नगाडे व डिजे अति ध्वनीत वाजविण्यावर निर्बध लावण्यात आले आहेत. गणशोत्सावादरम्यान ध्वनी प्रदूषण अधिनियमांचे पोलीस विभागाने पालन करून काही कारवाई सुध्दा केल्या आहेत. त्यातच गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्याचेही पोलीस विभागाच्या निदर्शनास आले आहे. अमरावती शहरात एकूण ४८४ धार्मिक स्थळे असून त्यामध्ये १३५ मंदिरे, १७६ मस्जिद, २९ बुध्दविहार आहेत. त्यापैकी ३४३ धार्मिक स्थळांना लाऊड स्पिकर्स नियमांच्या चाकोरीत राहून वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अजूनही १११ मंदिर, ३३ बुध्दविहार, ३ गुरुद्वारा आणि ७ चर्चला ध्वनिक्षेपक वाजविण्याची परवानगी देण्यात आली नाही. आगामी नवरात्रोत्सवात ध्वनीप्रदूषण अधिनियमांचे पालन करण्याचे आवाहन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाना पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी केले आहे. ही परवानगी ३१ डिसेंबरपर्यंत सार्वजनिक मंडळाना देण्यात आली असून त्यानंतर पुढील वर्षाकरिता पुन्हा सार्वजनिक मंडळांना परवानगी घ्यावी लागेल. असे पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
३४३ धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपकाची परवानगी
By admin | Updated: October 6, 2015 00:29 IST