अमरावती : जिल्ह्यात वर्षभरात ४०३६ सारीचे रुग्ण आढळून आलेत. त्यातील २७०५ संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीकरिता स्वॅब नमुने घेण्यात आले असता, ७२२ रुग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले. पैकी २० जणांचा मृत्यू झाला. तसेच सारी आजाराने ३२० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्राप्त झाली.
कोरोनासह सारी आजारानेही जिल्हावासीयांचे नाकीनऊ आणले आहे. १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत सारी आजाराचे ४०३६ रुग्ण आढळून आले. यात नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक १२२४, मे महिन्यात सर्वात कमी ३० रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे. एप्रिल २०२० मध्ये सारीचे ३३ रुग्ण आढळले. त्यातील कोरोना चाचणीअंती तिघे पॉझिटिव्ह आढळून आले. पैकी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. मे महिन्यात ३० रुग्ण आढळले. जूनमध्ये ६१ रुग्ण सारीचे आढळले. पैकी ५ रुग्णांना कोरोनाने ग्रासले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जुलैमध्ये १९२ रुग्ण सारीचे आढळले. त्यापैकी ५१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात ५७४ रुग्ण आढळले. त्यातील ११३ रुग्णांना कोरोनाने घेरले होते. पैकी १२ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबरमध्ये सारीचे ८०६ रुग्ण आढळून आले. त्यापैकी १३३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. ऑक्टोबरमध्ये २७० जणांना सारीने ग्रसले. त्यापैकी ९० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यातील १५ जण दगावले. नोव्हेंबरमध्ये १२२४ जणांना सारीने ग्रासले. त्यांची कोरोना चाचणी केली असता, ४०७ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पैकी १५ जणांचा मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये ८७ जणांना सारीची लागण झाली. त्यातील १३ जणांना कोरोना झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. जानेवारी २१ मध्ये १३१ जणांवर सारीचे उपचार करण्यात आले. त्यापैकी ४३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. उपचारादरम्यान १७ जणांना प्राण गमवावे लागले. फेब्रुवारी महिन्यात २३२ जणांना सारीची लागण झाली. त्यांची कोरोना चाचणी घेतली असता, ११४ जण कोविड पॉझिटिव्ह आढळले. पैकी २० रुग्णांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात ३९६ रुग्णांवर उपचारादरम्यान कोरोना चाचणी केली असता, १७० जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील २० जणांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची माहिती मेट्रन चंदा खोडके यांनी दिली.
बॉक्स
सारीने मृत्यूची महिनानिहाय आकडेवारी
महिना मृत्यू संख्या
एप्रिल ०२
मे -
जून २३
जुलै १३
ऑगस्ट ७६
सप्टेंबर ९६
ऑक्टोब २८
नोव्हेंबर ११
डिसेंबर ०८
कोट
सारीची लाट ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अधिक प्रमाणात आली होती. दरम्यान कोरोनानेदेखील कहर केला होता. यात उपचारादरम्यान बहुतांश मृत्यू झालेत. उपचारातील सातत्याने सारीवर मात केल्याचे आता दिसून येत आहे.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक