सात नगराध्यक्ष निवडणार : दोन ठिकाणी स्थगनादेशअमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. येत्या २२ जुलै रोजी सात नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष व नऊ उपाध्यक्षपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र, दर्यापूर व मोर्शीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. राज्यशासनाने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलेली मुदतवाढ मागे घेण्यात आली. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. या दोन्ही पदांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये त्या-त्या ठिकाणचे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाने जवळपास पूर्ण केली असताना अचानक दर्यापूर व मोर्शी येथील आरक्षणाबाबत दर्यापूर येथील प्रकाश चव्हाण व मोर्शी येथील प्रदीप कुऱ्हाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या निवडणुकीला न्यायालयाने ‘स्थगनादेश’ दिल्यामुळे मोर्शी व दर्यापूर येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष तसेच नऊ ठिकाणी उपाध्यक्षपदाची निवडणूक २२ जुलै रोजी होणार आहे. यासाठी १४ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जाहीर केली जाईल. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी १८ जुलै रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करून घेतले जातील. त्यानंतर प्राप्त अर्जांची लगेच छाननी करून अंतिम उमेदवारांची यादी घोषित केली जाईल. १९ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन मागे घेता येईल.
नगराध्यक्षपदासाठी २२ ला निवडणूक
By admin | Updated: July 12, 2014 23:23 IST