दर्यापूर : शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाइल फोन वापरण्यास अंगणवाडी सेविकांना त्रास होत असून नवीन पोषण ट्रॅकर ॲप हे इंग्रजी भाषेत असल्याने अंगणवाडी सेविकांना ते समजत नाही. त्यामुळे ते मोबाइल परत घ्यावे, या मागणीकरिता दर्यापूर तालुक्यातील ८ बिटच्या २०४ अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाइल शासनाला परत करत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर केले.
अंगणवाडीच्या कामकाजासाठी दिलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे असून आता ते मोबाइलही जुने झाले आहेत. त्यामुळे ते सतत नादुरुस्त होतात व त्याला दुरुस्ती करण्याचा खर्च तीन ते चार हजार रुपये येतो व तो सेविकांकडून वसूल केला जातो. आधीच कमी पगारात सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना हा आर्थिक भुर्दंड न झेपणारा आहे. केंद्र शासनाने लादलेले पोषण ट्रॅकर ॲप हे सदोष असून या ॲपमध्ये डिलीटचा पर्याय नाही. या ॲपमध्ये इंग्रजीमध्ये माहिती भरणे बंधनकारक असल्याने ॲपमध्ये मराठीत माहिती भरण्याची व्यवस्था करावी, तसेच मतदनिसांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्यात वाढ करावी, अशा विविध मागण्या आज दि. २० ला अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाइल शासनाला परत केले असून यावेळी दर्यापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका युनियनचे आशा टेहरे यांच्या नेतृत्वाखाली येवदा, वडनेरगंगाई, सामदा, शिंगणापूर, रामतीर्थ चंद्रपूर आमला या ८ बिटच्या २०४ अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाइल परत करत आपल्या मागणीचे निवेदन दर्यापूर तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात नागनाथ इप्पर व प्रशांत तायडे यांना सादर केले.