गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना सावकाराची पायरी चढावी लागते. अशावेळी त्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत गहाण जमिनी लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहे. यामध्ये सावकारांनी शेती बळकावल्याची ५१ प्रकरणे डीडीआर कार्यालयात दाखल झाली, यापैकी २९ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन १५ प्रकरणात १८.७८ हेक्टर आर. जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली आहे.
या जमिनीच्या इसारासाठी झालेले ३,६३,३०० रुपयेदेखील संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आले. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमन २०१४ पासून अस्तित्वात आला. यामध्ये कलम सावकारांकडे गहाण स्थावर मालमत्तांची चौकशी करण्यासाठी मार्च २०२५ पर्यंत ५१ प्रकरणे दाखल झाली. यामध्ये सुनावणी होऊन २९ प्रकरणे न्यायप्रविष्ट तसेच साक्षी पुराव्याअभावी निकाली काढण्यात आलेली आहेत. अन्य १५ प्रकरणात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अभिहस्तांतरण पत्र तसेच अवैध मालमत्ता घोषित करून ही मालमत्ता परत करण्यासाठी आदेश जारी केले होते.
जिल्हास्थिती...दाखल प्रकरणे - ५१निकाली काढली - २९प्रकरण प्रक्रियेत - ०७मालमत्ता परतीचे आदेश - १५परत केलेली शेती - १८.७८ हेक्टर
३२ अवैध सावकारांवर 'एफआयआर' दाखल सावकारी अधिनियमांतर्गत मार्च २०२५ पर्यंत सहकार विभागाकडे ३४६ तक्रारी प्राप्त आहे. यापैकी २३९ तक्रारी ह्या निरर्थक असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय ७५ प्रकरणात तालुकास्तरावर सहायक निबंधक यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. परवान्याशिवाय अवैधपणे सावकारी करणाऱ्या ३२ अवैध सावकारांवर 'एफआयआर' दाखल करण्यात आल्याची माहिती सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी दिली.
"अवैध सावकारीसंदर्भात निर्भिडपणे व पुराव्यासह तक्रारी दाखल कराव्यात, या सर्व तक्रारींची चौकशी करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल."- शंकर कुंभार, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)