अमरावती : राज्याच्या सहकार विभागात सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यातील प्रशासन व लेखापरीक्षण आस्थापनामधील अनुसूचित जमातींची १८० पदे रिक्त आहे. ही पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबवून भरण्यात यावी, अशी मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव (१६-ब) यांचेकडे ट्रायबल फोरम अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष रितेश परचाके यांनी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेला न्याय निर्णय व तद्अनुषंगाने या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय २१ डिसेंबर २०१९ नुसार सहकार विभागात अनुसूचित जमाती उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम पूर्णपणे राबविण्यात आलेली नाही, असा आरोप ट्रायबल फोरम या संघटनेने केला आहे.
सहकार विभागात सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, प्रशासन व लेखापरीक्षण आस्थापनांवर गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील एकूण मंजूर पदे ३ हजार ९४० आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी राखीव पदांची संख्या ३०५ आहे. यापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या १६३ आहे. अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या १३३ आहे.
"राज्याच्या सहकार विभागातील प्रशासन व लेखापरीक्षणमध्ये अनुसूचित जमातीची १८० पदे अद्यापही रिक्त आहेत. ही पदे विशेष पदभरती मोहीम राबवून भरण्यात यावी."- रितेश परचाके, विभागीय अध्यक्ष, ट्रायबल फोरम, अमरावती.