पान २ चे लिड
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : अवैध रेती उपसा थांबावा, घरकुलधारकांना रेती उपलब्ध व्हावी, यासाठी राज्याच्या पर्यावरण खात्याकडे लिलावाची परवानगी मागितलेल्या जिल्ह्यातील १७ रेतीघाटांना ती मिळण्याची शक्यता आहे. त्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता जिल्हा प्रशासनाला एक आठवड्यात करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ९६ रेतीघाट आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १७ रेतीघाटांच्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता जिल्ह्याच्या खनिकर्म विभागाला करावी लागणार आहे. त्यानंतरच राज्याचे पर्यावरण खाते हिरवी झेंडी दाखवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भातकुली तालुक्यात भालपडी, ढंगारखेडा, सोनारखेडा हा संयुक्त रेतीघाट, वाई रायपूर, चांदुरा, पोहरा पूर्णा, दर्यापूर तालुक्यातील नरदोडा, अलमपूर, सिकंदरपूर, रामतीर्थ, नांदेड बु., चंडिकापूर, टाकरखेडा, घुईखेड या रेतीघाटांच्या लिलावाला त्रुटी पूर्ण झाल्यावर राज्याच्या पर्यावरण खाते अंतिम मंजुरी देणार आहे. तिवसा तालुक्यातील उंबरखेड, जावरा, चांदूर ढोरे या रेतीघाटांना आगामी काळात परवानगी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धामणगावात एकमेव घाटाचा होणार लिलाव
तालुक्यातील सातपैकी केवळ दिघी महल्ले या रेतीघाटाच्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर परवानगी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी माहिती मागविली असल्याचे येथील तहसीलदार जगदीश मंडपे यांनी सांगितले.
----------------------------------------