साथरोगांचा प्रकोप : स्वच्छता, डास निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्नअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवडाभरात टायफाईडचे १५४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात साथरोगांचा वाढता प्रभाव पाहता आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. स्वच्छता व डास निर्मूलनाचे प्रयत्न आरोग्य विभागाद्वारे केले जात आहेत. जिल्हाभरात ठिकठिकाणी तापाचे हजारो रूग्ण आढळून येत आहेत. मागील दोन महिन्यांपासून रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात या दोन महिन्यांमध्ये ताप आजारांच्या ५ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. हीच स्थिती अद्यापही कायम आहे. २२ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य व आतंररुग्ण विभागात ५ हजार १९५ रुग्ण उपचारकरिता आले. त्यापैकी २ हजार रुग्णांना तापाने ग्रासले होते. याच आठवडयात तापाच्या ४९९ रुग्णांच्या रक्त नमुन्यांची तपासणी केल्यावर त्यापैकी १५४ रुग्ण टायफाईड पॉझिटिव्ह आढळून आले आहे. डेंग्यूचे दोन, गोवरचे ३, डायरियाचे ७५, निमोनियाचे १७ तर कावीळच्या ३ रुग्णांवर इर्विनमध्ये उपचार करण्यात आले.खासगी दवाखाने हाऊसफुल्लउपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. रूग्णांना स्वखर्चाने बाहेरुन आणावी लागणारी औषधी आणि वॉर्डात रुग्णांशी उद्धटपणाने वागणे आदी कारणांनी अनेक रुग्ण खासगी दावाखान्यात उपचार घेत आहेत. त्यामुळे खासगी दवाखाने रूग्णांच्या गर्दीने फुगले आहेत. गोंडवाघोलीत तापाची साथअचलपूर तालुक्यातील गोंडवाघोली येथे डायरिया, मलेरिया व अज्ञात तापाचे सध्या ३१ रुग्ण दाखल असून आठ जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली. दूषित पाणी, डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, सर्वत्र पसरलेली घाण आणि वातावरणात होत असलेला सततचा बदल यामुळेच डायरिया, मलेरिया व डेंग्यूसदृश आजार वाढल्याचे वैद्यकीय अधिकारी सरवत वर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
टायफाईडचे १५४ रुग्ण
By admin | Updated: October 6, 2014 23:04 IST