अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये आवश्यक अशैक्षणिक कामांसाठी केवळ १५ टक्के कर्मचारी उपस्थिती राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार लॉकडाऊन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियमावली लागू केली असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचा विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी निर्णय घेतला. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा, अशैक्षणिक कामांसाठी १५ टक्के उपस्थिती राहील, असा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनच्या अनुषंगाने जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तसेच परीक्षा विभागात मॉडरेशनच्या बैठकीसुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत १ मार्चनंतरच निर्णय होईल, असे प्र-कुलगुरू जयपूरकर यांनी स्पष्ट केले.
बैठकीला कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील यांच्यासह विभागप्रमुख हजर होते. महाविद्यालयांना या आदेशाचे पालन करणे बंधकारक असणार आहे.