अमरावती : तिवसा तालुक्यातील मुर्तिजापूर (तरोडा) ग्रामपंचायत गोदामात अवैधरित्या ठेवण्यात आलेल्या बनावट एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) खताच्या १०० बॅग कृषी विभागाच्या पथकाने मंगळवार दि. २४ जून रोजी जप्त केल्या. ५० हजाराचा हा माल आहे. सोमवारी आसरा येथे शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी पकडलेल्या आरोपीच्या माहितीच्या आधारे कृषी विभागाने ही कारवाई केली. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही अशा पध्दतीचे बनावट खत विक्री होण्याची व गोदामात साठवणूक केल्याची शक्यता दैनिक ‘लोकमत’ने सोमवारी वर्तविली होती. मुर्तिजापूर (तरोडा) येथे करण्यात आलेले बनावट एसएसपी खत हे भुसील, सीलीकॉन ६५ या नावाने व अॅग्रोकेमिकल्स, पेट्रोल पंप (६१०११) जि. भंडारा, कस्टमर केअर नं. ९८६०२७१८५६ या बनावट कंपनीचे आहे. यावर उत्पादन तारीख १४ मे २०१४ व किंमत ५०० रूपये असे छापलेले आहे. कृषी विभागाद्वारा याचे नमुने घेण्यात आले आहे. गावालगत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या गोदामात १५ दिवसापूर्वी ट्रकद्वारा हे खत आणण्यात आले होते. ग्रामपंचायत सरपंच पुनम वेरूळकर व सचिव सुनिल भुसारी यांना याविषयीची कुठलीही माहिती न देता शिपाई विजय मेश्राम याने हे खत गोदामात ठेवून घेतले होते. त्याच्या जवळचा नातेवाईक असणारा सुमित मेश्राम रा. यशोदानगर, अमरावती याने शिपायाच्या संपर्कातून या ठिकाणी कंपनीचे अधिकारी आहे असे सांगून आठवड्यापुरता या गोदामात माल ठेवला व गावातील हेमंत मेश्राम याला १४ व महेंद्र मेश्राम याला ४ खताच्या बॅग देखील कमी किमतीत विकल्या. आणखी किती शेतकऱ्यांना माल विकला याची चौकशी सुरू आहे. विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, विभागीय गुण नियंत्रक अधिकारी जी.टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात जि.प.चे कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे, जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी पुरूषोत्तम कडू, तालुका कृषी अधिकारी पंकज चेडे, कृषी अधिकारी आर.यू. पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
बनावट ‘एसएसपी’ खताच्या १०० बॅग जप्त
By admin | Updated: June 25, 2014 00:09 IST